पासिंगसाठी रिक्षावाल्यांचे हाल

| श्रीवर्धन | वार्ताहर |

सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना आरटीओकडून आपापल्या वाहनांचे पासिंग करुन घ्यावे लागते. नवीन रिक्षांसाठी दर दोन वर्षांनी तर वाहन आठ वर्षे वापरल्यानंतर ते दरवर्षी करुन घ्यावे लागते. वाहनांचे पासिंग हे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्यही आहे. परंतु, वाहनाचे पासिंगकरुन घेण्यासाठी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना आपापली वाहने घेऊन पेण तालुक्यातील जिते येथे जावे लागते. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या तीन चाकी रिक्षावाल्यांना श्रीवर्धन येथून मुंबई-गोवा महामार्ग अजूनही नादुरुस्त असल्याने आपले वाहन घेऊन जिते येथे जाणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे कार्यालय माणगावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आल्यास अथवा निदान वाहनांच्या पासिंगची व्यवस्था तरी एखाद्या मध्यवर्ती आणि सोयीच्या ठिकाणी केल्यास प्रवासी वाहतुकीची सार्वजनिक वाहने घेऊन घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांची मोठीच सोय होईल. तरी सक्षम यंत्रणेने या सूचनेचा गांभीर्याने विचार करुन वाहन चालकांची होणारी प्रचंड गैरसोय टाळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version