आ. बाळाराम पाटील यांची आंदोलनात शिष्टाई
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल विद्यार्थी वाहक संस्था आणि इतर संलग्न संघटनांच्या वतीने मंगळवारी (दि. 6) एकदिवसीय स्कूल बस बंद आंदोलन पुकारण्यात आले. स्कूल बस परवाना त्याचबरोबर शाळांचे संमती पत्र मिळत नसल्याने हा लढा उभारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थी आणि पालकांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. शिक्षक आ. बाळाराम पाटील यांच्या शिष्टाईमुळे हे आंदोलन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे.
पनवेल परिसरात मोठ्या संख्येने खासगी शैक्षणिक संस्था आहेत. यामध्ये विशेष करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून, सीबीएसी आणि स्टेट बोर्डच्या या शाळांमध्ये आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आजघडीला परिसरात जवळपास 700 स्कूल बस विद्यार्थी वाहतूक सेवा देत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून शाळेत ये-जा करतात. या विद्यार्थी वाहक वाहनांना परिवहन विभागाकडून परवान्यासाठी शाळांची संमती पत्र बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे पनवेल आरटीओकडून परवाने आडून धरण्यात आले आहेत. या कारणाने जवळपास 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करावी लागत आहे. परवाने नसल्याने इन्शुरन्ससुद्धा काढता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी वाहक खूप मोठ्या पेचामध्ये सापडले आहेत.
(दि. 6) आमरण उपोषणाबरोबरच वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने देण्यात आला होता. मात्र, सोमवारी यासंदर्भात शिक्षक आ. बाळाराम पाटील यांनी शिष्टाई करून एका बैठकीचे आयोजन केले. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील उपस्थित होते. त्यांनी परिवहन विभागातील वरिष्ठ त्याचबरोबर शिक्षण खात्यातील अधिकार्यांशी संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने विशेष बैठक बोलवण्याबाबत भूमिका विशद केली. त्यानुसार (दि. 8) पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय, रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनाची तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे पनवेल विद्यार्थी वाहक संस्था आणि इतर संलग्न विद्यार्थी वाहकांनी आपले आमरण उपोषण पुढे ढकलले. मात्र, मंगळवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून शासकीय यंत्रणा आणि शाळा व्यवस्थापनाला इशारा देण्यात आला. मंगळवारी पुन्हा एकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयात विद्यार्थी वाहकांना निमंत्रित करून लेखी पत्र त्यांना देण्यात आले.
700 स्कूलबस चालक एकवटले
पनवेल परिसरातील एकूण 700 स्कूल व्हॅन चालक या लाक्षणिक बंदमध्ये सहभागी झाले. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या पाठीमागील मैदानात सर्व विद्यार्थी वाहक एकवटले. त्यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी घोषणाबाजी केली. त्याचबरोबर परवाना नूतनीकरणाबाबत होत असलेली ससेहोलपट आणि शाळांकडून घेण्यात येणार्या आडमूठ्या भूमिकेचा त्यांनी निषेध नोंदवला.
पनवेल विद्यार्थी वाहक संस्था आणि इतर विद्यार्थी वाहकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल.
पांडुरंग हुमणे
अध्यक्ष, पनवेल विद्यार्थी वाहक संस्था
स्कूल बस बंद असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने शाळेच्या हजेरी पटावरदेखील संपाचा परिणाम झाला. आज कामावर दांडी मारून पाल्याला शाळेत सोडण्याला प्राथमिकता दिली.
प्रदीप पवार
पालक