जेएनपीए बंदर परिसरात नाराजीचा सूर
| चिरनेर | प्रतिनिधी |
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता गुरुवारी जेएनपीए येथील सिंगापूर बंदर प्राधिकरण (पीएसए) मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 चे हैदराबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. या ऐतिहासिक सोहळ्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उरण-रायगड येथे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोग यांची निमंत्रण पत्रिकेत मुख्य अतिथी म्हणून नावे असतानादेखील चौथ्या बंदरातील दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित न राहिल्याने जेएनपीए व सिंगापूर बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर घुमत होता.

कंटेनर टर्मिनलच्या उद्घाटनामुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्राला समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचा संकल्प व्यक्त करत, या प्रकल्पाचे यश पंतप्रधान मोदींच्या अमृत काल दृष्टिकोनला समर्पित केले.
जेएनपीए आणि पीएसएच्या सहकार्यामुळे हे टर्मिनल भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे. वाढवण बंदराच्या कार्यान्वयनामुळे जेएनपीए लवकरच जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. यामुळे महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल. याप्रसंगी भारत आणि सिंगापूर यांच्यात नवीन करारनाम्यांवर स्वाक्षऱ्या झाल्या, ज्यामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होईल. या टर्मिनलमुळे महाराष्ट्राने भारतातील बंदर क्षमतेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले असून, जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन समारंभाला केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खा. रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. पराग शाह, जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ, सीमाशुल्कचे आयुक्त विनल श्रीवास्तव, जेएनपीए विश्वस्त दिनेश पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.







