जनाब कौचाली यांचे गौरवोद्गार
| अलिबाग | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार रुजावा यासाठी शासनामार्फत तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर आयोजित करून विद्यार्थ्यांच्या शोधक बुद्धीला संधी दिली जाते. पण, शाळास्तरावर विज्ञानप्रदर्शन आयोजन करुन प्रत्येक विद्यार्थ्याला ही संधी उपलब्ध करून देणारे पीएनपीचे पाष्टी हायस्कूल हे म्हसळा तालुक्यातील एकमेव हायस्कूल आहे, असे गौरवोद्गार दि.1 डिसेंबर रोजी पाष्टी हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या शाळा स्तरावरील विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी गटसमन्वयक जनाब कौचाली यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन शांताराम कांबळे होते. याप्रसंगी सरपंच चंद्रकांत पवार, माजी सरपंच राजाराम धुमाळ, राजाराम दिवेकर, जगजीवन लाडू, प्रकाश लाड यांनीदेखील शाळेचे सुंदर आयोजन व नियोजनाबद्दल व विद्यार्थी सहभाग व उत्साहाबद्दल कौतुक केले. प्रदर्शन पाहताना परीक्षकांनी व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल पाहून त्यांना प्रेरणा दिली. प्रदर्शनात आठवीच्या गटातील 16 मॉडेल्स, तर 9 वी, 10 वीच्या गटातून 10 मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. या प्रदर्शनाला रा.जि.प. शाळा पाष्टी आणि रा.जि.प. शाळा मांदाटणेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
अल्पकालावधीत विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी मुख्याध्यापक सुदाम माळी, विज्ञान शिक्षक विनयकुमार सोनवणे, प्रफुल्ल पाटील, ललित पाटील, बिलाल शिकलगार, संदीप दिवेकर आणि प्रशांत जोशी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. अशा उपक्रमांमुळेच उद्याचा विवेकी नागरिक निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रप्रमुख नरेश सावंत यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेचा उपक्रम व यशाचा लेखाजोखा सादर केला. नववीच्या विद्यार्थिनीने ‘आम्ही प्रकाशबीज…’ या विज्ञान गीताने सर्वांना भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनयकुमार सोनवणे यांनी, तर आभार प्रफुल्ल पाटील यांनी मानले.