| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची सायरस पूनावाला स्कूल नागाव शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉजबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. न्यू होरायझ स्कूल खांदा कॉलनी पनवेल येथे नुकतीच डॉजबॉल राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कुमार गट मुले व मुली असे एकूण 15 शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सायरस पूनावाला स्कूल नागावची काव्या नरेश नागवेकर, अस्था वरुण बळी, अक्षरा शिवपुत्र हलगेनॉर, आणि नैतिक कमलेश जैन या विद्यार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली आहे, तसेच शाळेतील क्रीडा प्रशिक्षक राकेश म्हात्रे यांची स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर, लेखापाल अंकित भानुशाली, क्रिडा प्रशिक्षक राकेश म्हात्रे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







