पॉड हाऊस अडगळीच्या जागेत

मोकळी जागा असतानाही तीन खोल्यांची निर्मिती

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी पॉड हाऊस बांधले जात आहे. या पॉड हाऊसबद्दल मोठा गाजावाजा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, माथेरान येथे बांधण्यात आलेले पॉड हाऊस हे केवळ तीन खोल्यांचे आहे. ज्या ठिकाणी हे पॉड हाऊस बांधण्यात आले आहे, तेथील जागा पूर्णपणे अडगळीची आहे. माथेरान स्थानकात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना जुन्या नादुरुस्त इमारती यांच्यामध्ये हे पॉड हाऊस बनविण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे आणि केवळ तीन खोल्यांचे हेच का ते पॉड हाऊस, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

माथेरानमध्ये मध्य रेल्वे प्रशासन पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड प्रकल्प सुरु करणार असल्याने पर्यटांकाना दिलासा मिळणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात आलिशान पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड सुरु झाले आहे. माथेरान येथे स्थानकातील अडगळीच्या जागेत हे पॉड हाऊस बांधण्यात आले आहे. त्या पॉड हाऊस इमारतीची रचनादेखील आकर्षक नाही. त्याचवेळी आजूबाजूला अर्धवट कोसळलेल्या इमारती आणि पॉड हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तादेखील अडगळीचा आहे. त्यामुळे पॉड हाऊसबद्दल संभ्रमाचे वातावरण असून, माथेरान स्थानकात किमान 50 खोल्यांचे पॉड हाऊस बांधता येतील एवढी जमीन उपलब्ध आहे. त्यास्तही जुन्या अर्धवट कोसळलेल्या इमारती जमीनदोस्त करून जागा मोकळी केल्यास मोठी जागा तेथे निर्माण होऊ शकते, त्यामुळे माथेरान स्थानकात बनविण्यात आलेले पॉड हाऊस हे कर्मचार्‍यांचे निवासस्थानासारखे वाटत असल्याने पॉड हाऊसची नक्की संकल्पना कोणती? असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

Exit mobile version