। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषद, मुरुड जंजिरा शाखा आणि अंजुमन पदवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कोमसाप मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास अंजुमन इस्लामचे चेअरमन जैनुद्दीन कादिरी, सदस्य इस्माईल शेख, प्राचार्य डॉ. साजिद शेख, प्राध्यापक शोएब सर, कोमसाप मुरुडचे कार्याध्यक्ष अरुणजी बागडे, उपाध्यक्षा उषा खोत, खजिनदार प्रतिभा जोशी, सहसचिव प्रतिभा मोहिले, सहखजिनदार उर्मिला नामजोशी, जिल्हा प्रतिनिधी कवी सिद्धेश लखमदे, मुरुड शाखा युवाशक्ती प्रमुख आशिष पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन उर्दू भाषिक मुलीने अगदी सहजपणे मराठीत केले. संजय गुंजाळ यांनी त्यांच्या मनोगतात अंजुमन इस्लाम महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून ते यशस्वी करण्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
तसेच तरुणाईने हिंदू मुस्लिम ऐक्य जपावे हा संदेश दिला व मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड-जंजिरा युवाशक्ती शाखेने आयोजित केलेल्या पत्र मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.