दोनशेहून अधिक जणांना उलट्यांसह चक्कर आणि डोकेदुखी
। नांदेड । प्रतिनिधी ।
नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोनशेहून अधिक जणांना उलट्यांसह चक्कर आणि डोकेदुखीचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. दूषित पाणी प्यायल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नांदेड शहराजवळ असलेल्या नेरली या गावात दोनशेहून अधिक जणांना दूषित पाणी प्यायल्याने विषबाधा झाली आहे. नागरिकांना अचानक शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्री उलटी, जुलाब, डोके दुखणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. अचानक आजारी नागरिकांची संख्या वाढू लागली. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्णांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीतून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली. यामध्ये पंधराहून अधिक लहान मुलांचा समावेश आहे. शनिवारी (दि. 28) सकाळपासूनदेखील अनेकांना असाच त्रास होत असल्याचे चित्र आहे. त्यांची तपासणीकरुन उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर, गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी प्यायल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच, सध्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून टाकीची सफाई सुरु करण्यात आली आहे.