| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल मालुसरे यांचे वडील ज्ञानोबा मालुसरे यांची संघाच्या अध्यक्षपदी तर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मनोहर पार्टे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
पोलादपूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातील सर्वपक्षिय प्रमुख पदाधिकारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये विचारविनिमयासाठी एकत्र जमले होते. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ठाकरे व शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार गट, तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गट, शेकापक्ष, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सामंजस्याची भूमिका दर्शविली. यावेळी अध्यक्षपदासाठी ज्ञानोबा मालुसरे आणि उपाध्यक्षपदासाठी शेकापक्षाचे मनोहर पार्टे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कार्यकारिणी सदस्यांचे अर्ज भरून बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयदेखील सर्वपक्षियांमध्ये झाला.






