दुहेरी हत्याकांडातील आरोपीला पोलिसांनी केली अटक

। पनवेल । प्रतिनिधी ।

दुहेरी हत्याकांडातील आरोपीला तळोजा पोलिसांनी दहा तासाच्या आत अटक केली. तुहीन बीश्‍वरूप घोष रा. तळोजा एमआयडीसी असे आरोपीचे नाव आहे.

3 मार्च रोजी आयजीपीएल तळोजा एमआयडीसी येथील रस्त्यावर एक सायकलस्वार मृत अवस्थेत आणि मोटरसायकल वरील व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी पाहणी केली असता जखमींना अज्ञाताने डोक्यात कोणत्या तरी हत्याराने मारून हत्या केल्याची आणि जखमी केल्याचे समजले. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही वेळाने जखमी व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. तळोजा पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीला दहा तासाच्या आत ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी हा आयजीपीएल तळोजा एमआयडीसी येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याच्याकडे पैसे नसल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. त्याने रागाच्या भरात लोखंडी पाईप घेऊन रस्त्याने जाणारा सायकलस्वार राजू बासुमतारी (29) याच्या डोक्यावर लोखंडी पाईपने फटके मारले आणि त्याला ठार मारले. यावेळी साईनाथ भुर्‍या पाटील याने आरोपीला का मारहाण करतो असे विचारले असता आरोपीला राग आला आणि त्याने साईनाथ याला देखील लोखंडी पाइपने डोक्यात मारहाण करून ठार मारले. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास केला जात आहे.

Exit mobile version