| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील जोहे येथील बेकायदा गर्भपात प्रकरणात फरारी असलेल्या विवाहित मयत महिलेच्या नणंद व नणंदेच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली नव्हती. यासंदर्भात ८ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध होताच दादर सागरी पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात विवाहित महिलेच्या सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून १६ आठवड्यांचा गर्भनष्ट केल्यामुळे त्या विवाहितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मयत महिलेचा पती, सासू व डॉक्टर शेखर धुमाळ यांना पोलिसांनी तातडीने अटक केली होती. परंतु मयत महिलेची नणंद देवता भोईर व तिचा पती विनायक भोईर या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती नव्हती. आज पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या दोन्ही आरोपींना नागोठणे येथून त्यांच्या मित्राच्या घरातून अटक केली आहे.
या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी गुन्हा दाखल झाल्या दिवसापासून त्यांच्या राहत्या घरी राहत नव्हते. या आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी दोन पथके बनवली होती. आरोपींच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी शोध घेतला तसेच या दोन्ही आरोपींनी स्वतःकडील मोबाईल नंबर बंद करून ठेवले असल्याने त्यांना ट्रेक करणे कठीण झाले होते. वाशी, वढाव, पेण, मुरुड व रोहा या ठिकाणी आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला. आरोपी त्याच्या मित्राकडे नागोठणे येथे असल्याची खबर पोलिसांना मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंदराव पाटील, पोलीस हवालदार प्रकाश कोकरे, पोलीस हवालदार प्रवीण खाडे, पोलीस नाईक मनीष म्हात्रे व महिला पोलीस कॉन्स्टेबल नूतन लाड यांच्या पथकाने नागोठणे येथून फरार आरोपींना अटक केली अशी माहिती दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील यांनी दिली.