| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोलीत एका इंजिनियर तरूणाने वडीलांचे सेवानिवृतीचे पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले. मात्र, पैसे हरल्यामुळे वडीलांचे पैस परत करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व सर चोरला. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चोरीचे गांभीर्य घेत खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू असताना खालापूर पोलिसांनी गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व सोन्याचा सर चोरणाऱ्या चोराला बेड्या ठोकल्या.
घोडीवली गावच्या हद्दीतील नावढे घोडीवली रस्त्यावरून चालत जाणाऱ्या कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व सोन्याचा सर असे एकूण 35 हजार रुपये किमतीची वस्तू तरुणाने एका मोटरसायकलवर जाऊन पळून नेली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत खालापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता मोठ्या शिताफीने चोरट्याला 25 ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप यांच्या पथकाने ताब्यात घेतले. तरुणाने हुशारीने अंगावरील शर्ट बदलला नंतर मोटारसायकलची नंबरप्लेट बदलली. हे सीसीटीव्हीत कैद झाल्यावर इलेक्ट्रिक डिप्लोमा केलेल्या जयेश देशमुख याला अटक केली. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप हे करीत असून आरोपीला 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इंजिनिअर चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
