तडीपार महिलेकडून पोलिसांना मारहाण

महिलेसह तिघांना केली अटक

| दांडगुरी | वार्ताहर |

तडीपार केलेले असतानादेखील श्रीवर्धन शहरात आलेल्या महिला आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. रसेड यांच्या पथकातील महिला पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केल्याची घटना गणेश आळीत शनिवारी (दि. 20) घडली. याप्रकरणी तडीपार एका महिलेसह तिघांना श्रीवर्धन पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगमा शब्बीर केसरकर ही श्रीवर्धन पोलीस अभिलेखावरील तडीपार महिला असून, श्रीवर्धन शहरातील गणेश आळीत आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ती या ठिकाणी खुलेआम वावरत असल्याने त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. रसेडे यांच्यासमवेत महिला पोलिस कर्मचारी मीनल कांबळे व कविता देवर्डेकर यांचं पथक कारवाईसाठी गेले होते. यावेळी आरोपी महिलेने इतर तीन आरोपी मुनिर केसरकर, सादिक व राहिमा केसरकर यांच्याशी संगनमत करून पोलीस पथकाला धमकावले व अवजड वस्तूने महिला कर्मचारी मीनल कांबळे यांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणण्याचे काम केले. याच तडीपार महिलेने यापूर्वीदेखील खा. सुनील तटकरे यांनी फेसबुकलाइव्ह करत शिवीगाळ केली होती.

श्रीवर्धन पोलिसांनी या चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी व पोलीस निरीक्षक एस.पी. पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version