कोएसोच्या विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद; अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यास सुरुवात
| अलिबाग | प्रतिनिधी |
अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याने तरुण पिढी बिघडण्याचा धोका वाढला आहे. हा धोका रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. अलिबागमधील को.ए.सो. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून अंमली पदार्थाच्या सेवनाचे तोटे आणि त्याचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची माहिती देण्यात आली.
रायगड जिल्ह्यामध्ये यापुर्वी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय चालत होता. पोलिसांकडून कारवाई करूनही अंमली पदार्थ विक्री करणारे माफिया हा धंदा राजरोसपणे चालवित होते. तंबाखू, गुटखा, गांजा अशा अनेक नशेली पदार्थांच्या आहारी जाऊन तरुण पिढी बिघडण्याचा धोका निर्माण झाला होता. रायगडच्या नव्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी हाती घेतल्यावर त्यांनी अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यास सुरुवात केली. दारु, मटका जुगार अशा अनेक प्रकारचे धंदे बंद करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ नये, म्हणून पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी शाळा, महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले. त्यानुसार जिल्ह्यात जागतिक अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने अलिबाग पोलीस ठाण्याच्यावतीने को.ए. सो इंग्लिशमिडीअम स्कूलमधील विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले. यावेळी अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली. तसेच, अंमली पदार्थ सेवन करणार नाही, याबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी घेतले स्वरक्षणाचे धडे
अलिबाग पोलिसांच्यावतीने मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले. या सत्राच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रिझम संस्थेच्या अध्यक्ष तपस्विनी गोंधळी यांनी विद्यार्थिनींना स्व संरक्षणाबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक धडे दिले.
112 ची जनजागृती
पोलीस आणि नागरिकांचा संवाद कायम राहवा, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवता यावी, म्हणून पोलीस दलामार्फत 112 या विनाशुल्क संपर्क क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली आहे. संकटात असलेल्या व्यक्ती, महिलांनी हा क्रमांक डायल केल्यास अवघ्या 15 ते 20 मिनीटांत पोलीस घटनास्थळी पोहचून संकटग्रस्तांना मदतीचा हात देतील. तसेच, कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे व अथवा वाईट कृत्य करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी सविस्तर माहिती अलिबाग पोलिसांनी दिली.







