लहानमोठ्या धबधब्यांवरही नजर
| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात वर्षा सहलीसाठी खारघर येथील पांडवकडा आणि अनेक लहानमोठे धबधब्यांकडे पर्यटक आकर्षित होतात. असुरक्षित पर्यटन करून स्वत:चे प्राण गमावू नये म्हणून पनवेलच्या खारघर व तालुका पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सुरक्षेचा पवित्रा घेत शनिवार व रविवारी या धोकादायक पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त उभा केला होता. त्यामुळे वर्षासहल करणाऱ्यांचा हिरमोड झाला.
पावसाळ्यात पांडवकड्यातून कोसळणारा धबधबा हा मुंबईतील तरुणांना आकर्षित करतो. याच धबधब्यामधून निघणाऱ्या पाणवाटेत अतिवृष्टीवेळी अचानक पाण्याचा लोंढा वाढत असल्याने अनेक वर्षांपासून हा पांडवकडा जीवघेणा बनला आहे. पोलीस दरवर्षी वर्षासहली धोकादायक ठरणाऱ्या धबधब्यावर जाऊ नये यासाठी बंदोबस्त ठेवतात. मात्र, पोलिसांची नजर चुकवून पांडवकड्यावरुन कोसळणाऱ्या धबधब्यात आनंद घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या धबधब्याकडे जाणारे चार विविध मार्गावर खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सुर्वे यांनी शनिवार व रविवारी 15 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त उभा केला होता. आतापर्यंत 14 पेक्षा अधिक तरुणांचा पांडवकड्याच्या धबधबा आणि तेथील पाणी वाहून नेणाऱ्या पाणवाटेत बुडून मृत्यू झाले आहेत.
पर्यटकांची आवडती ठिकाणे
पनवेलमध्ये गाडेश्वर येथील देहरंग धरण परिसर, लहान मोरबे धरण परिसर, वाघोली धबधबा, कुंडी धबधबा, साई गाव धबधबा, हरिग्राम येथील नदीपात्रात, धोदानी येथील नदीपात्रात, चिंध्रण व मोहदर येथील नदीपात्रात आणि शांतीवन या ठिकाणच्या नदीपात्रांमध्ये आणि माची प्रबळ तसेच कर्नाळा किल्ला या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वर्षा सहलीसाठी पर्यटक येतात. ही सर्व ठिकाणे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी या परिसरात शनिवार व रविवारी 40 पोलीस कर्मचारी व दोन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
नागरीकांनी वर्षा सहलीचा आनंद घ्यावा. मात्र पावासाचा जोर पाहता व धबधब्यांच्या ठिकाणची सूरक्षा लक्षात घेता, जिवावर बेतेल असे धोकादायक पर्यटन टाळावे. पनवेल तालुका पोलिसांनी यासाठी या रविवारपासून धोकादायक पर्यटनस्थळी पोलीस बंदोबस्त उभे करण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करुन या धोकादायक पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे.
गजानन घाडगे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस







