| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या तीन तरुणींना कोथरुड पोलीस ठाण्यात आणून मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. पतीसह सासरच्या कुटुंबाच्या छळाला कंटाळून पुण्यात आलेल्या संभाजीनगरच्या विवाहितेला आसरा दिल्याच्या कारणातून ही अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल पाच तास रिमांड होममध्ये डांबून ठेवल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर पीडित तरुणींनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलं. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनीही हा प्रश्न लावून धरला तरीही अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. या सर्व घडामोडीनंतर रोहित पवारांनी ट्वीट करत सात प्रश्न विचारले आहेत. ज्याची उत्तरं अद्याप मिळाली नाहीत. रोहित पवारांनी एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली. यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कोथरुड परिसरातील हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेल्या एका मिसिंग कम्प्लेंटशी संबंधित आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. या पीडित विवाहितेला या तीन मुलींनी मदत केली होती. पुण्यात तिला राहायला आसरा दिला होता. ज्यावेळी विवाहित महिला घरातून गायब झाली, तेव्हा संभाजीनगरमध्ये याबाबत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती.
ज्यावेळी संभाजीनगर पोलिसांनी या मिसिंग तक्रारीचा तपास केला, तेव्हा त्यांना विवाहितेचं लोकेशन पुण्यातील कोथरुड भागात असल्याचं आढळून आलं. यानंतर स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता संबधित तीन मुलींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना पोलीस ठाण्यात आणून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केलाय. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. यात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जातंय.







