| नाशिक | प्रतिनिधी |
एका पोलीस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः सुद्धा आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या जेलरोड मॉडेल कॉलनी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जेलरोड मॉडेल कॉलनीमध्ये मंगळवारी (दि.24) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. जेलरोड भागातील मॉडेल कॉलनी योगमाला अपार्टमेंटमध्ये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई स्वप्निल दीपक गायकवाड (36) हे आपल्या सहा वर्षीय भैरवी गायकवाड या चिमुरडीसह राहत होते. संध्याकाळच्या सुमारास स्वप्निल गायकवाड यांनी भैरवीला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास देऊन तिची हत्या केली. त्यानंतर पंख्याला दोरी बांधून स्वतःचं आयुष्य संपवलं. बराच वेळ झाला तरी घरातून कुणी बाहेर येत नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता स्वप्निल गायकवाडने आत्महत्या केल्याचे आढळलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. स्वप्निल गायकवाड यांचं मागील वर्षी त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रचंड मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, इतका टोकाचा पाऊल स्वप्नील गायकवाड यांनी का उचलला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरसाठ दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहे.







