हत्येचा प्रयत्न करणारा गजाआड

न्यायालयाने सुनावली दोन दिवस कोठडी; मांडवा सागरी पोलीसांची कारवाई

। अलिबाग । प्रतिनिधी ।

किरकोळ कारणावरून एकाच रुममध्ये राहणार्‍या कामगाराने दुसर्‍या कामगारावर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या डाव्या कुशीत सुरी खूपसून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपीला अवघ्या काही तासातच पकडण्यात मांडवा पोलिसांना यश आले. आरोपीला गुरुवारी (दि.26) दुपारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदानंद मलिक असे या आरोपीचे नाव असून बलदेव मलिक असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही मुळचे ओरीसा राज्यातील असून सध्या अलिबाग तालुक्यातील झिराड पाडा येथे राहत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून झिराडपाडा येथे सुरु असलेल्या बांधकाम ठिकाणी ते बिगारी म्हणून काम करीत होते. याच परिसरात कामगारांच्या राहणार्‍या पत्र्याच्या रुममध्ये एकत्र राहत होते. मंगळवारी (दि.24) सायंकाळी एकाच रुममध्ये असताना सदानंद हा बडबड करीत होता. त्यावेळी बलदेव याने त्याला बडबड करू नको असे सांगितले. त्याचा राग धरून आरोपी सदानंद याने भाजी कापण्याच्या सुरीने बलदेव याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.आर. भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत यांनी तपासाची सुत्रे हालवली. काही तासातच आरोपीला जेरबंद करून त्याला अटक केली.

Exit mobile version