सावधान! पनवेलमधील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त

। पनवेल । वार्ताहर ।
पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण पर्यटन प्रेमींना खुणावत आहेत. पण धबधबे, धरणात उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात. मात्र पनवेलमधील करंबेळी, कोंडले, मोर्बे येथे पर्यटकांनी जाऊन जीवितहानी होऊ नये, म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांनी पर्यटन ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सततच्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल तालुक्यातील नदी, नाले, तलाव, धरणे, बंधारे, ओसंडून वाहत आहेत.

सर्व डोंगर, माळरान, शेती हिरवीगार झाली आहे. पिकनिकसाठी जाणार्‍यांना ही स्थळे भुरळ घालत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात येण्यासाठी येथील वातावरण साद घालीत आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी मोर्बे, कोंडले, करंबेली या पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी आनंदित असतात. केव्हा विकेंड येतो याची आतुरतेने वाट पाहत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल येथील पर्यटक प्रचंड गर्दी करतात. काही जण पोलिसांची नजर चुकवून येथील धबधबे, नाल्यात उतरतात. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने जीवितहानी होते. त्यामुळे असे कोणतेही प्रकार घडू नयेत, याकरीता पर्यटनस्थळांवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

Exit mobile version