शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिसी शिक्षण

जिल्ह्यातील 16 शाळांची निवड

| अलिबाग | प्रमोद जाधव |

पोलिसांमधील असलेली भीती दूर करणे. विद्यार्थ्यांमध्ये विविध मुल्य रुजविणे आणि शालेयस्तरापासून पोलिसी शिक्षण देण्यासाठी पोलीस स्टुडंड कॅडेट अभियान सुरु केले आहे. या अभियानासाठी 16 शाळांची निवड करण्यात आली आहे. यातून त्यांना पोलिसी शिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस संबंधित असलेली माहिती, कवायत आदी धडे प्रात्यक्षिकांबरोबरच व्याख्यानाच्या माध्यमातून देऊन विद्यार्थ्यांना जागृत ठेवण्याचे काम केले जात आहे.

शाळकरी मुलांचे अपहरण, मुलींवर अत्याचार अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना प्रतिबंधित उपाय कसे करावे याचे ज्ञान शालेय दशेपासूनच मिळावे यासाठी पोलीस स्टुंंडट कॅडेट अभियान रायगड पोलीसांर्फत सुरु केले आहे. शाळकरी मुलांमध्ये जागृकता निर्माण व्हावी यासाठी हा अभियान जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्याची मोहिम पोलीस दलांनी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 16 शाळांची निवड केली आहे. त्यामध्ये पेण तालुक्यातील सावरसई, वरवणे, कर्जत तालुक्यातील पाथरज, पिंगळस, चाफेवाडी, अलिबागमधील कोलघर, रोहामधील सानेगांव, खालापूरमधील डोलवली या आठ शासकिय माध्यमिक आश्रम शाळा, तसेच अलिबाग नगरपरिषद शाळा क्रमांक सहा, नगरपरिषद उर्दु माध्यमिक विद्यालय शास्त्रीनगर- खोपोली, नगरपरिषद हिंदी माध्यमिक विद्यालय विहारी-खोपोली, के.एम.सी. उर्दु सेकंडरी स्कूल हाल बुद्रूक खोपोली, वासरंगमधील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, नगरपरिषद माध्यमिक विद्यालय ताकई, रोहामधील चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे.

शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विविध मुल्ये रुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. वाहतूक, सायबर गुन्हेगारी व अन्य गुन्हेगारीबाबत माहिती देऊन विद्यार्थी व विद्यार्थींनींमध्ये जनजागृती सुरु करण्यात आली आहे. आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना हे धडे दिले जात असून शाळांमध्ये कवायतदेखील घेऊन त्यांना शारीरीक व मानसिकदृष्टया सक्षम ठेवण्याचा प्रयत्न रायगड पोलिसांनी केला आहे .या उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाबाबत माहिती मिळावी. पोलीस खात्याबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारने पोलीस स्टुडंड कॅडेट अभियान सुरु केले आहे. या अभियानाची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात सुरु केली आहे. शाळांची निवडही करण्यात आली आहे.

अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक , रायगड
Exit mobile version