पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले सायबर सुरक्षेचे धडे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांचे मार्गदर्शन
| नेरळ | प्रतिनिधी |
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहतानाच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांपासून दूर राहावे, अशी सूचना कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी केली. तालुक्यातील चिंचवली डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात संभाजी यादव बोलत होते.

पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या सूचनेनुसार कर्जत तालुक्यातील चिंचवली डिकसळ येथे असलेल्या भाऊसाहेब राऊत कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस आणि विद्यार्थीदशेत घडणारे गुन्हे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव हे उपस्थित होते. रेल्वेतून प्रवास करताना घ्यावयाची काळजी याविषयी काही उदाहरण देऊन आपली सुरक्षितता कशी राखली जाईल याबद्दल काही सूचना दिल्या. तर सायबर सुरक्षा तसेच सायबर क्राईम हे मोबाईलच्या अतिवापरामुळ घडणारे गुन्हे असून, त्यातून गुन्हे आपल्या हातातून घडू शकतात. त्यावेळी कदाचित अमली पदार्थ यांचे व्यसनदेखील लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि महिलांसाठी मध्य रेल्वेकडून 1512 हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे, त्या क्रमांकावर योग्य वेळी मदत मागावी, असे आवाहन संभाजी यादव यांनी केले.

उपस्थित विद्यार्थ्यांना रेल्वे पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांचे कामकाज व दैनंदिनी कामासंबंधी माहिती दिली. या कार्यशाळेस चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असून, प्रा. रवींद्र तावडे, प्रा. मोहन शेळके, कुणाल माने, दिनेश बोरसे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, गोपनीय विभागाचे राजेंद्र बागुल, अंमलदार नितीन मोहिते यांचाही कार्यशाळा यशस्वी करण्यात महत्त्वाचा सहभाग होता.

Exit mobile version