35 हजार रुपयांचा दंड वसूल
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली खोपोली राज्य महामार्गावर असलेले परळी गाव सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार व महत्वाची बाजारपेठ आहे. मात्र नियमबाह्य वाहन चालकांमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. जांभुळपाडा पोलीस दूरक्षेत्र पोलीसांनी वाहनचालकांवर धडक कारवाई करून तब्बल 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
परळी बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे जाणार्या येणार्या वाहनांना मार्ग मिळत नसल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते. शिवाय बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील रस्त्याने चालणे मुश्किल होते. या संदर्भात वारंवार परळी ग्रामपंचायत व पाली पोलीस यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी देखील परळी बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पाली पोलिसांच्या वाहतूक शाखेने तसेच पाली पोलीस ठाणे अंतर्गत जांभुळपाडा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस यांनी संयुक्तरित्या परळी बाजारपेठेत धडक मोहिम राबविली. या धडक मोहिमेत साधारणपणे 67 केसेस करण्यात आल्या तर 35 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली गेली. यावेळी सहाय्यक फौजदार मोहन म्हात्रे, एस. एस. खेडेकर, निलेश महाडिक, कांचन भोईर, बी. एच. वाव्हळ आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
