पोलीस वसाहतींना घरघर; खाकी गणवेशाला छप्पराची चिंता

। पेण । वार्ताहर ।
सरकारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी राहत असलेल्या वसाहती त्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आल्या असल्या, तरी त्या गैरसोईच्याच अधिक ठरत आहेत. पोलीस कर्मचारी-अधिकारी राहत असलेल्या वसाहतींची दयनीय अवस्था झाली. काही इमारती धोकादायक असून पर्यायी व्यवस्थेअभावी कर्मचार्‍यांना यामध्ये जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. अनेक इमारती इतक्या जुन्या आहेत की, त्यावर दुरुस्तीची तात्पुरती मलमपट्टी उपयोगाची नाही. या इमारतींची पुनर्बांधणीच व्हायला हवी. पण तोपर्यंत रहिवाशांची व्यवस्था कुठे करायची, हादेखील प्रशासनापुढे पडलेला मोठा प्रश्‍न आहे.

पेण शहराचा विचार करता रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी मुंबईच्या हाकेच्या अंतरावर. मात्र पेण पोलीस ठाण्यात येणार्‍या पोलिसांना आपल्या कुटुंबासाठी राहण्यासाची सोय नाही. आजच्या घडीला पाहता अधिकार्‍यांसह 128 कर्मचारी पेण तालुक्यात कार्यरत आहेत. यामध्ये पेण पोलीस ठाण्यात  4 अधिकारी 57 कर्मचारी, वडखळ पोलीस ठाण्यात 3 अधिकारी 38 कर्मचारी आणि दादर पोलीस ठाण्यात 2 अधिकारी 24 कर्मचारी कार्यरत असून निवासाची सोय एकूण 71 जणांची होऊ शकते. मात्र आजच्या घडीला पोलीसलाईन वसाहतीमध्ये 5 मोठ्या इमारती व दोन बैठ्या चाळी आहेत.

या 5 इमारतींपैकी फक्त एका बिल्डींगमध्ये 5 कर्मचारी राहतात. ते ही जिव मुठीत घेऊनच. आज पेण तालुक्यात पोलीस कर्मचार्‍यांना राहण्यासाठी स्वतःच्या हक्काची घरे नाहीत. पोलीस वसाहतीमध्ये 1989, 1987 च्या सुमारा बांधलेल्या ज्या चार मोठया इमारती आहेत त्यांचा नियमांनुसार 25 वर्ष होउन गेल्याने त्या कालबाह्य झालेल्या आहेत. एकतर पाडून नव्याने बांधणे गरजेचे आहे. अथवा त्याचा स्ट्रक्चर ऑडीट करून त्या दुरूस्त करणे गरजेचे आहेत. तर बैठ्या चाळींची अवस्था पूर्णता मोडकलीस येऊन या चाळींवर झाडेझुडपे वाढली आहेत. आज 128 पोलीस कर्मचारी पेण तालुक्यात कार्यरत आहेत. त्यातील फक्त पाच कर्मचारी सरकारी घरात राहतात. बाकीच्या कर्मचार्‍यांसाठी सरकारी घर उपलब्ध नाहीत ही बाब किती खेदजनक आहे.

Exit mobile version