| चिपळूण | प्रतिनिधी |
येथील बाजारपेठेत परवानगी न घेता फटाक्याची विक्री करणार्या 25 फटाके विक्रेत्यांना चिपळूण पोलिसांनी रविवारी नोटीस बजावली आहे. फटाके विक्रीची परवानगी घ्यावी, तसेच अनुचित प्रकार घडल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही या नोटीसमध्ये नमूद आहे.
दिवाळीनिमित्त चिपळूण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर फटाके विक्रीची दुकाने रस्त्यालगतच मांडण्यात आली आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहर व लगतच्या खेर्डी परिसरात रस्त्यालगतच फटाके विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यासाठी नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, सर्वच नियम धाब्यावर बसवून विक्रेते परवानगी न घेताच फटाक्यांचे स्टॉल लावतात. चिपळूण बाजारपेठेत विनापरवानगी फटाक्यांची विक्री करणार्या 25 विक्रेत्यांना पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. फटाके विक्री करण्यासाठी कोणतीही परवानगी न घेतल्याने या विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली. फटाके विक्री करताना दुकानाच्या नजीक अग्निशमन यंत्रणा तसेच दुकानांमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे नोटीसमध्ये नमूद आहे