पोलीस अधिकाऱ्याकडून विवाहितेवर अत्याचार

। बीड । प्रतिनिधी ।

एका पोलीस अधिकाऱ्याने बंदूकीचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करुन अश्लील फोटो व व्हिडीओ काढल्याची घटना समोर आली आहे. रविंद्र लिंबाजी शिंदे असे अत्याचार करणाऱ्या संशयित पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत 39 वर्षीय पीडितेने शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडिता व संशयित रवींद्र शिंदे यांची घरे शेजारी असल्याने त्यांची जुनीच ओळख होती. त्याची पोलीस उपरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर तो जिल्ह्याबाहेर गेला. परंतु, पीडितेशी तो कायम संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला 2013 मध्ये रात्रीच्या वेळी बळजबरीने घरात घुसून त्याने बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला आणि पीडितेचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढल्याचे फिर्यादी म्हटले आहे. तसेच, या प्रकाराविषयी कोणाला सांगितले तर तिच्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली. त्याने वारंवार अत्याचार केल्यानंतर पीडिता गर्भवती राहीली असता त्याने बळजबरीने गर्भपात करायला लावला. अलिकडे दि. 1 जून रोजी पुन्हा तो पिडीतेच्या घरात शिरला आणि बळबजरी केली. तर, दि. 1 जुलै रोजी पीडिता व तिच्या कुटूंबाला जिवे मारुन टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली असल्याचे पीडितेने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Exit mobile version