पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची फसवणूक

खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेल भागात राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला पोलीस दाम्पत्याने सहा शासकीय कामांमध्ये 50 टक्के भागीदारीत घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. रमेश जाधव व पुष्पलता जाधव असे या दाम्पत्याचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या घटनेतील तक्रारदार या नवीन पनवेलमध्ये राहण्यास असून, त्यांचे पती पोलीस अधिकारी आहेत. तर त्यांची फसवणूक करणारा रमेश जाधव हादेखील पोलीस असल्याने त्याची सोनवणे कुटुंबियांसोबत चांगली ओळख झाली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये रमेश जाधव व पुष्पलता जाधव यांनी तक्रारदाराची भेट घेऊन पुष्पलता जाधव यांच्या नावे असलेल्या दोन नोंदणीकृत कंपन्यांना वीज वितरण कंपनीची सहा वेगवेगळी कामे मिळाल्याचे सांगितले होते. या कामातून त्यांच्या कंपनीला भरपूर आर्थिक फायदा होत असल्याचे सांगून त्यांच्या कंपनीला मिळालेली कामे चालू करण्यासाठी भांडवलदार वैयक्तिक बँक खात्यावर मागून म्हणून 50 टक्के भागीदार शोधत असल्याचे त्यांनी सांगितले होते. चांगला नफा मिळणार असल्याचे जाधव दाम्पत्याने यांनी सांगितल्यानंतर त्यांनी जाधव दाम्पत्याच्या कामात 50 टक्के भागीदार म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घतेला. त्यानंतर जाधव दाम्पत्याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामादेखील करून घेतला. जाधव दाम्पत्याला मिळालेल्या कामासाठी ज्याप्रमाणे भांडवल हवे होते, त्याप्रमाणे तक्रारदार महिलेस भांडवलाची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर पाठवून देत होत्या.

त्यानंतर जून 2019 मध्ये जाधव दाम्पत्याने कामात मिळालेला नफा म्हणून 25 लाख रुपये दिले. तसेच इतर सर्व कामे चालू असल्याचे व लवकरच ती कामे पूर्ण करून दिलेली रक्कम व कामाचा नफा त्यांना देण्याचे आश्वासन जाधव दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर जाधव दाम्पत्याने कामासाठी काही पैसे लागणार असल्याचे सांगून तक्रारदाराकडून पुन्हा 10 लाख रुपये घेतले. परंतु, या भागीदारीत ठरल्यानुसार जाधव, दाम्पत्य तक्रारदार यांना कामाच्या ठिकाणी घेऊन जात नव्हते. तसेच त्यांना कामाच्या वर्कऑर्डरदेखील दाखवत नव्हते. त्याबाबत तक्रारदाराने विचारणा केल्यास जाधव दाम्पत्य टाळाटाळ करत होते. मात्र, तक्रारदाराने वारंवार कामाबाबत व वर्कऑर्डरबाबत विचारपूस केल्यानंतर जाधव दाम्पत्याने त्यांच्याकडे भांडवल म्हणून गुंतवलेल्या रकमेचा नफा म्हणून 25 लाख रुपये तक्रारदार यांना परत केले. मात्र, त्यानंतर त्यांनी कोणतीही रक्कम दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्यांच्याकडे वारंवार भांडवलाची व नफ्याच्या रकमेची मागणी केली. मात्र, ते वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारुन नेत होते. त्यानंतर जाधव दाम्पत्य फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version