| रायगड | जिल्हा प्रतिनिधी ।
सागरी सुरक्षेसाठी रायगड पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. बुधवारी (दि.30) सकाळी सहा वाजल्यापासून रस्त्यावर खाडी, सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदरांसह समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणीस किनाऱ्यावरील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. यासाठी होमगार्ड जवानची मदत ही घेण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी कवच अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले आहे.
सागरी सुरक्षा अधिक बळकट ठेवण्यासाठी तसेच सागरी व खाडी किनारी होणाऱ्या संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीने सागरी कवच अभियान सुरु केले आहे. या अभियानासाठी जिल्ह्यातील 15 हून अधिक खाडी व सागरी पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाक्या नाक्यावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांसह एकूण एक हजार सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. 80पोलीस अधिकारी, 650 पोलीस अंमलदार, 76 होमगार्ड, 204 सागरी सुरक्षा दलाचा समावेश आहे. सागरी कवच अभियान 36 तासांचे आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याबरोबरच सागरी किनारी होणाऱ्या संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, काशीद, मांडवा, आवास, रेवस, किहीम, रेवदंडा, नागाव, आक्षी, मुरूड, दिवेआगार, आगरदांडा, दिघी, श्रीवर्धन, म्हसळा अशा अनेक समुद्रकिनारी तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बंदरावरील सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले. रस्त्यावर खाडी, सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदरांसह समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. या अभियानाद्वारे रस्त्यांवरील वाहनांची तपासणी केली जात असून समुद्रकिनारी आधुनिक साधनसामुग्रीचा आधार घेत समुद्रातील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता या अभियानाचा समारोप होणार असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली. रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत असताना जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प आहेत. मागील काही वर्षापूर्वी जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडीमध्ये शस्त्रसाठा सापडला होता. त्यानंतर रेवदंडयासह जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनारी अंमली पदार्थाचा साठा सापडला होता. रेवदंड्यामध्ये समुद्र किनारी एक आधुनिक यंत्र ही दिसून आले होते. जिल्ह्यातील सागरी सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी रायगड पोलिसांमार्फत हे अभियान राबविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर
