| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 शांततामय, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल व खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली.
2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश डॉ. विशाल नेहुल यांनी दिले. मतदान केंद्रांची रचना, सीसीटीव्ही नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन, असामाजिक घटकांवरील कारवाई तसेच निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनची सुरक्षा यांचा त्यांनी काटेकोर आढावा घेतला. डॉ. विशाल नेहुल यांच्या सूचनांनुसार खोपोलीमध्ये पोलीस दलाने दंगा काबू योजना राबवून तसेच रूट मार्च काढून निवडणूक पूर्व वातावरणात कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची तयारी पूर्ण केली आहे.







