| उरण | वार्ताहर |
जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्याप्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने घर सोडून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने कळंबोली पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंदवली आहे.
सुंदरसिंह शीतलसिंह ठाकूर नेमणूक उरण पोलीस ठाणे असे बेपत्ता झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुंदरसिंह यांना एका बँक मॅनेजरने कोट्यवधी रुपयाला गंडा घातला आहे. बँक मॅनेजर रमाकांत परीडा हा ठाकूर यांचा मित्र आहे. रमाकांत परीडा हे इंडसन बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ठाकूर आणि परीडा हे गेल्या चार वर्षांपासून एकमेकाला चांगले ओळखतात. याचा फायदा घेऊन परीडा यांनी पोलीस कर्मचारी ठाकूर यांना खालापूर तालुक्यात चांगली जमीन घेऊन देतो, तुम्ही पैसे द्या, अशी माहिती देऊन ठाकूर यांच्यासह नवी मुंबई पोलीस दलातील अन्य दोन कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन कोटी रुपये परीडा यांच्याकडे दिले होते. पैसे देऊनदेखील जमीन देत नसल्याने आपली फसवणूक झाली आहे हे या कर्मचाऱ्यांनी ओळखले होते. ही फसवणूक झाल्यानंतर या तीन कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदवला आहे. याचा तपासदेखील पोलीस अधिकारी घेत आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणाला कंटाळून ठाकूर हे गेल्या आठ दिवसांपासून कर्तव्यावर गेले नाही. उलट, काही दिवसांपूर्वी कर्तव्यावर जातो असे सांगून ठाकूर घरातून बाहेर पडले होते. मात्र, ते ना कर्तव्यावर गेले, ना घरी परत आले. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने कळंबोली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, ठाकूर यांनी एक चार पानी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. यामध्ये परीडाने माझी फसवणूक केली असून, मी कंटाळलो आहे आणि कुटुंब सोडून जात असून, मी स्वतःला संपवत आहे, असा मजकूर लिहिला आहे.






