| रेवदंडा | वार्ताहर |
स्वच्छ, सुंदर व सुरक्षित समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग तालुक्यातील नागाव हे पर्यटनस्थळ म्हणनू पर्यटकांच्या पसंतीस उतरले असून, तेथील वाढत्या पर्यटनाने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यानिमित्ताने नागावची सुरक्षितता संदर्भात ग्रामस्थ व व्यावसायिक यांच्याशी चर्चा व मार्गदर्शन कोकण परिक्षेत्र कोकण भुवन नवी मुंबई पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी केले. त्याचप्रमाणे नागावमध्ये लवकरच पोलीस चौकी सुरू करण्यात येईल, असेही दराडे म्हणाले.
नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी नागाव ग्रा.पं. सभागृहात दि. 17 फेब्रुवारी रोजी सायकांळी पाच वाजता नागावची सुरक्षितता याबाबतचे चर्चासत्र कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोकण परिक्षेत्र कोकण भुवन नवी मुंबई पोलीस महानिरीक्षक संजय दराडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासमवेत रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथरे, पोलीस निरीक्षक अलिबाग पोलीस ठाणे किशोर साळे यांची उपस्थिती होती. यावेळी नागाव ग्रा.पं. माजी सरपंच नंदकुमार मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्य व सदस्या यांच्यासह मोठ्या संख्येने नागाव ग्रामस्थ, महिला यांची उपस्थिती होती.
यावेळी नागाव वाढते पर्यटन व त्यासाठी सुरक्षितता, महिला सुरक्षितता याविषयी पोलीस महानिरीक्षक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागाव पोलीस चौकीबाबत केलेली मागणी लवकरच पूर्ण केली जाईल व तेथे पूर्ण वेळ पोलीस कर्मचारी तैनात केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी उपस्थित महिलावर्ग, ग्रामस्थ व व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला. शेवटी दराडे फाऊंडेशनच्या वतीने नागाव ग्रामपंचायत वाचनालयास बुकशेल्फ कपाट भेट देण्याचे आश्वासन दिले.