मद्यसाठा जप्त, 20 नायजेरीयन नागरिकांची धरपकड
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
खारघरमधील दोन रो-हाऊसवर मारलेल्या छाप्यात नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 26 लाख 77 हजारांच्या मेफेड्रॉनसह 22 हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच ड्रग्ज पार्टीसाठी जमलेल्या 20 नायजेरीयन नागरिकांची धरपकड केली आहे.
खारघर सेक्टर-7 मधील लेमन किचन व जेमिनी किचन येथे ड्रग्ज तसेच दारूच्या पार्टी सुरु असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेतील 150 महिला, पुरुष पोलीस अधिकारी व अंमलदार, दंगल नियंत्रण पथक व फॉरेन्सिक टीमसह सोमवारी पहाटे छापा टाकला होता. यावेळी दोन्ही किचनमध्ये 13 पुरुष आणि 7 नायजेरीयन महिलांचा समावेश होता. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून तब्बल 26 लाख 77 हजार 500 रुपयांचे 107 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन तसेच 22,490 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. कारवाईत पकडलेल्या 13 नायजेरीयन नागरिकांकडे कोणताही भाडे करार नाही. तसेच सी फॉर्मशिवायच खारघरमध्ये बेकायदा उपाहारगृह चालवत असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी परदेशी नागरिक कायदा व रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. तसेच दोन्ही उपाहारगृहांच्या जागा मालकांना गुन्ह्यांमध्ये सहआरोपी केले आहे. सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.