। सुधागड -पाली । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारंभाची सांगता बुधवारी (ता.17) झाली आहे. यानिमित्ताने पाली पोलीस ठाण्यामार्फत अमृतमहोत्सवी 75 किलोमीटर रिले दौंडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावागावाजवळ पोलिसांचे जंगी स्वागत करण्यात आले. ही दौड पाली पोलीस ठाणे येथून बुधवारी (ता.17) सकाळी 7 वाजता सुरू झाली. सुरुवातीला काही पोलीस धावक झाप गावापर्यंत एकत्र धावले. त्यानंतर तिरंगा घेऊन एक पोलीस धावक विशिष्ट काही किलोमीटर धावले. त्यानंतर दुसरा पोलीस धावक तो झेंडा घेऊन पुढील अंतर धावले, त्यानंतर तिसरा पोलीस धावक असे करत करत दहा ते बारा पोलीस धावकांकडून 75 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करण्यात आले आहे. ही दौड सुरू करताना पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, तहसीलदार दिलीप रायण्णावर, गटविकास अधिकारी विजय यादव आदी पदाधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे, पोलीस कर्मचारी, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
दौडचा मार्ग
ही दौड ही झाप, वावळोली, सिद्धेश्वर, पुई, खांडसई, वैतागवाडी, नाडसुर, ठाणाळे, कोंडगाव, नवघर, आसरे, कासारवाडी, हरनेरी, जांभुळपाडा, परळी, नानोसे, व-हाड-जांभुळपाडा, पेडली, तिवरे, चिवे, मजरे जांभुळपाडा, रासल, आंबोले व पाली आदी सुधागड तालुक्यातील गावांतून धावून पूर्ण करण्यात आली. शेवटचा धावक उंबरवाडी पर्यंत आल्यानंतर येथे आधीपासून धावलेले सर्व धावक सामील झाले व ते सोबत पाली पोलीस स्थानकापर्यंत धावून 75 किलोमीटरची ही रिले दौड पूर्ण केली. अशा प्रकारे सदर दौंडची सांगता पुन्हा पोलीस ठाणे येथे भारत माता की जय या जयकाराने संपन्न करण्यात आली आहे