परीक्षार्थ्यांना निकालाचे वेध
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांच्या मैदानी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी ( 2 एप्रिल) आठ केंद्रात घेण्यात आली. 3 हजार 535 उमेदवारांपैकी 1 हजार 793 जणांनी परीक्षा दिली. यामध्ये 535 महिलांचा समावेश होता. सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत झालेली लेखी परीक्षा शांततेत पार पडली. आता उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
रविवारी सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्ष लेखी परीक्षा सुरु होण्यापूर्वी सकाळी साडेसहा वाजता, प्रवेशपत्र देण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. परीक्षेच्या कालावधीत उशीर होऊ नये यासाठी काही विद्यार्थी गेल्या दोन दिवासांपासून अलिबागमधील राहिले. तर काही विद्यार्थी रात्रीच अलिबागमध्ये दाखल झाले. काही हॉटेलमध्ये तर काही त्यांच्या नातेवाईकांकडे राहिले. लेखी परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी आदल्या दिवसापासून परीक्षा केंद्रांवर पोलीसांचा कडेकोट पहारा तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील 50 टक्के पेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अलिबागमधील जेएसएम महाविद्यालय, अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, को. ए. सो. जा.र. ह कन्याशाळा, कुरुळ येथील आरसीएफ सेकंडरी अॅन्ड हायर सेकंडरी स्कूल, वेश्वी येथील पीएनपी कॉलेज, होली चाईल्ड स्कूल, व पीएनपी मराठी हायस्कूल या आठ केंद्रात परीक्षा घेण्यात आल्या. ही परीक्षा शांततेत पार पडली असून कोणताही गैरप्रकार परीक्षेच्या कालावधीत झाला नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी पार पडली. ही परीक्षा शांततेत झाली आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असून त्याची प्रक्रिया वेगाने सुरु राहणार आहे. त्यामुळे येत्या 4 एप्रिल पर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. – सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक
1,793 जण परीक्षेला
रायगड जिल्हा पोलिस भरती 2021 च्या लेखी परीक्षेसाठी 3 हजार 535 उमेदवारांपैकी 1 हजार 793 जणांनी परीक्षा दिली. यामध्ये 535 महिलांचा समावेश आहे. 272 जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रीया 2021 साठी एकूण 272 जागांसाठी 19 हजार 176 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आँनलाईन पद्धतीने सादर केले होते. त्यापैकी लेखी परीक्षेकरिता 3, 535 उमेदवार पात्र झाले असून त्यामध्ये 929 महिला उमेदवारांचा समावेश होता. लेखी परीक्षेकरिता 3, 535 उमेदवारांपैकी 1 258 पुरुष उमेदवार तर 535 महिला उमेदवार हजर होते. उमेदवारांच्या लेखी परीक्षेत कोणातही अनुचित प्रकार घडू नये याकरीता रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. परीक्षेकरिता आवश्यक साधनसामुग्री परीक्षा केंद्रावर पुरविण्यात येवून अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक असून या परीक्षेवेळी रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे स्वतः परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून लेखी परीक्षा प्रक्रियेमध्ये कोणताही अनुचित प्रकार याकरीता विशेष खबरदारी घेतली होती. या परीक्षेचा निकाल शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.