प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीकडून वायू प्रदुषणासोबत आता नव्यानेच सुरु केलेल्या ध्वनी प्रदुषणाविरोधात शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी पोयनाड पोलिस विरोधात तक्रार केली होती. पोयनाड पोलिसांनी सदर तक्रार पेण पोलिस ठाण्याकडे वर्ग केली. मात्र आठ दिवस उलटुन गेल्यानंतरही पोलिस प्रशासनाकडून ना गुन्हा दाखल करण्यात आला की कोणती कारवाई त्यांमुळे नाराजी व्यक्त करीत पंडित पाटील यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांच्याशी संपर्क साधला असता सदर तक्रार अर्जावर चौकशी सुरु असल्याचे सांगितले.
जे.एस.डब्ल्यु कंपनीतुन मोठया प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. कंपनीच्या परिसरातील गावांमध्ये प्रदुषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास सहन करत असताना मागील महिन्याभरापासुन कंपनीच्या प्लांटमधून मोठा आवाज सुरु झाला आहे. या आवाजामुळे या परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. याबाबत कंपनी प्रशासनाला विचारणा केली असता कंपनीचे प्रशासकीय अधिकारी हेतु पुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे कंपनीतुन होणारे प्रदुषण टाळण्यासाठी कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पंडित पाटील यांनी करत त्याबाबत पोयनाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावेळी पंडित पाटील यांनी जेएसडब्ल्यू ही पोलाद निर्मितीची कंपनी असताना त्यांनी येथे ऊर्जा प्रकल्प सुरु करत आहे. यासंदर्भातील कोणती जनसुनावणी घेण्यात आली होती का असा सवालही केला होता. जनतेला छोटया छोटया कारणांवरुन त्रास देणार्या शासकीय अधिकार्यांना जेएसडब्ल्यू सारख्या कंपनीच्या प्रदुषणाबाबत का दुर्लक्ष केले जात आहे. जेएसडब्ल्यू कंपनीला लोकांच्या आरोग्याच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही पंडित पाटील यांनी केला आहे. सदर तक्रार करुन आज आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र पोलिसांनी याबाबत काहीच कार्यवाही केलेली दिसत नाही. त्यामुळे पोलिसांची एकुणच कार्यपद्धतीबाबत पंडित पाटील यांनी शंका व्यक्त केली आहे.