| पनवेल | प्रतिनिधी |
महापालिका निवडणुकीच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे व फरार आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अमली पदार्थ व मद्याची विक्री व सेवन करणारे, बेकायदा हत्यार बाळगणारे गुन्हेगार व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यातच खारघर पोलिसांनी नुकतेच सेक्टर-40 मधील पापडीचा पाडा येथे बेकायदेशीर गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक केली आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून अवैध धंदे, गुन्हेगार, एनडीपीएस, अवैध शस्त्राबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे व त्यांचे पथक खारघर हद्दीमध्ये गस्त घालत असताना खारघरमधील पापडीचा पाडा भागात रेकॉर्डवरील आरोपी समु इक्बाल शेख हा संशयितरीत्या फिरताना निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 1 गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. हा गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे त्याने कुठून व कशासाठी आणले, याचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलिसांकडून अवैध अग्निशस्त्र बाळगणारे, अमली पदार्थ आणि अवैध दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.







