150 किलो मांस जप्त
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाण्याला मिळालेल्या माहितीनुसार, गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार नेरळ पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तब्बल गोवांशीय जनावरे यांचे 150 किलो मांस तसेच दोन लहान वयाची बैल आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत दोघांना अटक केली असून, नेरळ पोलिसांकडून सातत्याने गोवंशीय तस्करी आणि हत्या रोखण्यासाठी धाडी टाकण्याचे सत्र सुरू ठेवले आहे.
दामत गावातील उमामा वसीम नजे आणि अब्दुल वसीम नजे यांच्या घरात आणि बेड्यामध्ये जनावरे तस्करी करून आणली आल्याची खबर नेरळ पोलिसांना मिळताच शुक्रवारी (दि. 7) नेरळ पोलीस ठाण्याचे एक पथक हे दामत गावात पोहोचले. या धाडीमध्ये उमामा नजे यांच्या घरामध्ये आणि बेड्यामध्ये दोन बैल कत्तलीसाठी आणून ठेवल्याचे, तर एका बाजूला गोवंशीय जनावरे यांचे तब्बल 150 किलो मांस आढळून आले. त्यावेळी त्या गोवंशीय मांसाचे वजन करीत असताना पोलिसांनी उमामा नजे आणि अब्दुल वसीम नजे या दोघांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणी वजन काटा आणि जनावरे त्यांची कत्तल करण्यासाठी आणलेली लोखंडी खांडणी, तीन धारदार चाकू आणि लोखंडी सुरीदेखील ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, सुटका झालेल्या दोन्ही बैलांची रवानगी कोंभळ वाडी येथील गोशाळेत केली आहे.
नेरळ पोलीस ठाण्यात दामत गावातील उमामा वसीम नजे आणि अब्दुल वसीम नजे या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आणि प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे आणि अन्य पोलिसांनी ही कारवाई केली.







