ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका

| पनवेल | प्रतिनिधी ।

ट्रेकिंगसाठी उरण तालुक्यातील रानसई-खैरकुटी परिसरातून कल्हे गावाजवळील डोंगरावर गेलेल्या सहा तरुणांची अंधार पडल्याने वाट चुकली. त्यांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सर्व तरुणांना सुखरूप खाली आणले.

आयुष संदीप गुप्ता (कळंबोली), वेदांत किरण दिवेकर (खांदा कॉलनी), वेदांत नितीन नाईक (रोडपाली), आदित्य जयराम राय (खारघर), प्रसनजीत कुंदन कांबळे (सीवूड) आणि निखिल जयस्वार (रोडपाली) हे सहा मित्र रानसई येथून ट्रेकिंगसाठी निघाले होते. कल्हे गावाजवळील डोंगरावर पोहोचल्यानंतर संध्याकाळी अंधार पडल्याने त्यांची दिशाभूल झाली आणि परतीचा मार्ग सापडेनासा झाला.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला. माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय दोरगे, पोलीस शिपाई तुकाराम भोये आणि पोलीस पाटील संतोष मोरे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

डोंगराळ परिसर आणि घनदाट अंधारामुळे शोधकार्य आव्हानात्मक ठरले. मोबाईल लोकेशन आणि नकाशाच्या साहाय्याने पोलिसांनी सुमारे दीड तास अथक प्रयत्न करून अडकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. त्यानंतर सर्व सहा जणांना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली आणण्यात आले. कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत न होता सर्वजण सुखरूप घरी परतले.

पनवेल तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, या बचावकार्यासाठी नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्यात ट्रेकिंगला जाणाऱ्यांनी आवश्यक सुरक्षितता बाळगावी, स्थानिक मार्गदर्शकाची मदत घ्यावी आणि अंधार होण्यापूर्वी परतीचा प्रवास पूर्ण करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Exit mobile version