दीड हजार पोलिसांची राहणार नजर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कृष्ण जन्माष्टमीनंतर गोपाळकाळानिमित्त दहीहंडीचा जल्लोष रायगड जिल्ह्यात रंगणार आहे. हा सोहळ्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित अलिबागमध्ये तसेच रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव पाच सप्टेंबरला होणार आहे. जिल्ह्यामध्ये आठ हजार 870 दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. यामध्ये गोविंदा पथकांसाठी लाखोंची बक्षिसे असणार आहेत. यानिमित्ताने 339 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असणार आहे. त्याची तयारी पोलिसांनी केली आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी यावर्षी 4 सप्टेंबरला असून, पाच सप्टेंबरला गोपाळकाला सण असणार आहे. हा सण साजरा करण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकेदेखील सज्ज झाली आहेत. वेगवेगळ्या मंडळांच्या वतीने दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष व महिला गोविंदा पथकाच्या अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकाचे चारपासून सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकाला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. रिल्स स्पर्धांसाठीदेखील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अलिबागसह रोहा, मुरूड, पेण, पनवेलसह अन्य तालुक्यांमध्ये लहान-मोठ्या दहीहंडीचा कार्यक्रम तसेच मिरवणुका काढल्या जाणार आहेत.
जिल्ह्यामध्ये एक हजार 956 सार्वजनिक आणि सहा हजार 914 खासगी दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रचंड गर्दी होणार आहे. हा उत्सव पाहण्यासाठी महिला, पुरुष, तरुण मंडळी, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यात एक हजार 518 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 950 पोलीस अंमलदार, 350 होमगार्ड, 68 वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, चार आरसीपी दल, अतिशिघ्र दल एक, स्ट्रायकींग फोर्स अकरा यांचा समावेश असणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
