तालुक्यात रात्रंदिवस नाकाबंदी, कडेकोट बंदोबस्त
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील आंबेनळी घाटातील रायगड पोलीस विभागातर्फे रात्रंदिवस नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून उतरणार्या वाहनांची तपासणी करण्यासाठी रायगड पोलीस विभागातर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे. या तपासणी नाक्यावर दोन बॅरिकेट्स उभे करून एका छोट्याशा तात्पुरत्या शेडखाली बसलेले खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी तसेच एक वाहतूक पोलीस आणि रात्री मोठ्या संख्येने खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी वाहनांची कसून तपासणी करीत असल्याचे दिसून येत आहे. कापडे बुद्रुक येथील पेट्रोल पंपासून काही अंतरावर हा तपासणी नाका उभारण्यात आला असून, संशयास्पदरित्या आढळल्यास संबंधित वाहनाची तपासणी वाहन थांबवून केली जात असल्याचे दिसून येत आहे. यावेळी वाहनचालकांकडून सहकार्य केले न गेल्यास कमी संख्येने असलेल्या पोलीस कर्मचार्यांकडून पोलादपूर पोलीस ठाण्याला कळविले जाऊन पोलादपूर पोलिसांकडून हे वाहन चोळई लेप्रसी मिशन पुलापर्यंत अडविण्यात येण्याची तत्परता दाखविण्यात येत आहे. रात्री साधारणपणे सर्वच वाहनांची तपासणी व चौकशी केली जात असून, रात्रंदिवसामध्ये साधारण 32 ते 50 वाहनांची तपासणी व कागदपत्रांची खातरजमा केली जात आहे.
(दि.7) मे पर्यंत या तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून वाहनांची झाडाझडती घेण्यात येणार असून, वाहनांतून मद्यवाहतूक, अवैध शस्त्रवाहतूक, रोख रक्कम अथवा दंगल तसेच अनुचित घटना घडविण्यासाठी मानवी वाहतूक होत असल्यास संबंधित वाहने अडविण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतुक पोलीस धायगुडे आणि अन्य पोलीस कर्मचारी यांनी दिली.