जिल्ह्यात पोलिसांचे शक्ती प्रदर्शन

भयमुक्त वातावरणात सण उत्सव साजरे करण्यासाठी प्रयत्न

| अलिबाग | प्रमोद जाधव |

जिल्ह्यात गोपाळकाळासह गणेशोत्सव सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत. तसेच सण, उत्सव भयमुक्त वातावरणात साजरे करता यावेत, म्हणून रायगड पोलिसांनी जिल्ह्यात पोलीस संचलन करण्यात आले. जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावे, वाड्यांमध्ये जाऊन पोलिसांतर्फे संचलन करण्यात आले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.16) ऑगस्ट रोजी गोपाळकाला सण आहे. या दिवशी जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजारहून अधिक दहीहंडी उभारण्यात येणार आहेत. दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम दुपारपासून सुरू होतो. या दिवशी जिल्ह्यात लाखो नागरिक उपस्थित राहून दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाचा आनंद लुटतात. जिल्ह्यामध्ये बुधवार (दि.27) ऑगस्टपासून गणरायाचे आगमन घरोघरी होणार आहे.

मुंबई, पुणे, बोरीवली, अशा अनेक ठिकाणी नोकरीनिमित्त असलेले चाकरमानी देखील हा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. घरगुती बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत हजारो गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. दहा दिवस धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. मंगलमय व आनंदमय वातावरण हा उत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु, काही समाज कंटक व अतिउत्साही व्यक्तींमुळे सण, उत्सवांवर गालबोट लागण्याची भिती अधिक असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका असतो. हा धोका निर्माण होऊ नये, म्हणून रायगड पोलिसांमार्फत जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस संचलन करुन शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वेगवेगळ्या समितीच्या बैठका घेण्यापासून संचलन गावे, वाड्यांमध्ये तसेच शहरी भागात करण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी. भयमुक्त वातावरणात सण, उत्सव साजरे करता यावेत, यासाठी हा उपक्रम पोलिसांनी सुरू केल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version