बाईकर्सना पोलिसांनी शिकवला धडा

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

वाशी सेक्टर 17 ते बेलापूर असा पामबीच रोडवर बायकर्सने त्यांच्या परदेशी बनावटीच्या दुचाकी या भन्नाट वेगाने हाकण्याच्या स्पर्धा करत असल्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या स्पर्धात्मक रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या बाईकर्सना पोलिसांनी धडा शिकवत तिघां विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रणव पद्माकर जाधव (रा. वाकोला ब्रिज नेहरूनगर मुंबई), सूर्यदेव सिंह सर्जेराव देसाई (रा. टिळक नगर चेंबूर), अभिषेक देवदास साबळे (रा. जय मल्हार संस्था अपार्टमेंट शेडुंग गाव) अशी तिघांची नावे आहेत.

19 नोव्हेंबर रोजी नेरूळ पोलीस ठाण्याचे वपोनि ब्रह्मानंद नाईकवाडी यांना पामबीच रस्त्यावर तीन ते चार बाईकर स्पर्धात्मक मोटारसायकल भन्नाट वेगाने दिसून आले. त्यांनी स्वतः बाईकरचा पाठलाग करून पामबीच रोडवर सारसोळे सिग्नल ते वज्राणी सिग्नल नेरूळ येथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना आणि त्यांची बाईक रोखून ताब्यात घेतली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version