निर्जन स्थळांवर राहणार पोलिसांची नजर

चिंचोटी प्रकरणाची यंत्रणेकडून दखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

चिंचोटी येथील तरुणीवरील हल्ल्यानंतर रायगड पोलिसांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण शहरी भागामधील निर्जनस्थळांची माहिती घेऊन त्याठिकाणी अधिक गस्त वाढविली जाणार असून पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

रायगड जिल्हा पोलीस दलाच्या अखत्यारीत येणार्‍या क्षेत्रामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 26 लाखापेक्षा अधिक असून सुमारे दोन हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचार्‍यांच्या भरोवश्यावर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हा महत्वाचा ठरत असताना औद्योगिक जिल्हा म्हणूनदेखील नावारुपाला येऊ लागला आहे. जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प अस्तित्वात असून नवे प्रकल्पदेखील येऊ घातले आहेत. अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील एका तरुणीचा विनयभंग करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न गेल कंपनीतील कंत्राटी कामगारांनी केला होता. या घटनेनंतर रायगड पोलीसांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली निर्जन स्थळे तसेच ज्या भागात महिलांची वर्दळ अधिक आहे, त्या भागांचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तेथील पोलीस अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

सीसीटीव्ही बसणार
निर्जन भागांची माहिती घेऊन महिलांचा वावर किती आहे, याची माहिती पोलीस ठाण्यांकडून मागविली जाणार आहे. ज्याठिकाणी रात्रीच्यावेळी अंधार आहे, त्याठिकाणी सीसीटीव्ही व पथदिवे लावण्याबाबत नगरपरिषद व ग्रामपंचायतींना सुचना केल्या जाणार आहेत.

चिंचोटी येथील घटनेनंतर पुन्हा प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्यांमार्फत पोलीस गस्त त्या भागात वाढविली जाणार आहे. परिणामकारक गस्ती होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना गस्तीसाठी दुचाकी दिली जाणार आहे. लवकरच गस्तीचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावी व्हावी यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Exit mobile version