| पनवेल | प्रतिनिधी |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 ते 11 डिसेंबरदरम्यान सिंधुदुर्गनगरी येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 400 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुंबई विभागातून पुरुष व महिला मिळून 10 खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले, यामध्ये पोलीस मुख्यालय कुस्ती संकुलातील सहा कुस्तीगीरांचा समावेश होता.
या स्पर्धेत पोलीस मुख्यालयाच्या कुस्तीगीरांनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 6 पदकांची कमाई केली. यामध्ये सोहम ढगे (38 किलो) व वेदांत येळकर (68 किलो) तसेच स्वप्निल लावंड (75 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावून थेट दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले. यश घुगे (62 किलो), हृषिराज पाटील (52 किलो) आणि संशिखा शर्मा (33 किलो) यांनी कांस्यपदक मिळवून संघाच्या यशात मोलाची भर घातली.
या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. पोलीस आयुक्त मा. मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त मा. संजय येनपुरे, पोलीस उपआयुक्त मा. संजयकुमार पाटील तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मा. विजय चौधर यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. पोलीस मुख्यालय कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक संपत्ती येळकर यांच्यासह समाधान अडके वस्ताद, संजय चव्हाण, प्रदीप जाधव, दीपक वरखडे व सर्व पालकांनी खेळाडूंना मोलाचे सहकार्य केले. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व स्तरांतून खेळाडूंना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







