। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक व बँडसमन या पदासाठी लेखी परीक्षा शनिवारी अलिबाग व पेणमध्ये झाली. या परीक्षेमध्ये सहा जणांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. अलिबाग व पेण केंद्रामध्ये या घटना घडल्या आहेत. बीडसह जालना, औरंगाबादमधील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
रायगड पोलीस दलातील 391 जागांसाठी लेखी परीक्षा शनिवारी (दि . 10 ) घेण्यात आली. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंद्रामध्ये एक हजार 940 पुरुष व एक हजार 175 महिला तसेच पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंद्रामध्ये एक हजार 632 पुरुष उमेदवारांची दुपारी लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेसाठी पुरुष तीन हजार 572 व महिला उमेदवार एक हजार 175 असे एकूण चार हजार 747 उमेदवार उपस्थित होते. ही परीक्षा सुरळीत शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोठ पहारा ठेवण्यात आला होता. केंद्रामध्ये प्रवेश देण्यापूर्वी उमेदवारांची कसून तपासणी करण्यात आली.त्यावेळी सहा उमेदवारांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आढळून आल्या. या सहाही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस जप्त केले आहेत.
रामदास ढवळे,दत्ता ढेंबरे, ईश्वर जाधव,गोरख गडदे, सागर जोनवाल, आणि शुभम कोरडे असे या उमेदवारांची नावे असून बीड , औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.