| मुंबई | प्रतिनिधी |
सातरस्ता परिसरात बारा वर्षांच्या मुलीचा पाठलाग करून तिला उद्वाहनात जाण्यापासून रोखण्यासाठी तिचा हात पकडल्याचा प्रकार घडला आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी पोलीस शिपाई असून, त्याला याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी रविवारी (दि.13) अटक केली. या सर्व प्रकाराचे इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण झाले आहे. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारा वर्षांची मुलगी आग्रीपाडा परिसरात राहते. ती शनिवारी इमारतीखाली प्रसाद आणण्यासाठी आली होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच पीडित मुलीने उद्वाहनात जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला अडवले व तिचा हात पकडला. त्यानंतर तिला जबरदस्तीने तळ मजल्यावरून पायऱ्यांनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला असता तिने याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 45 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, तो पोलीस शिपाई पदावर ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.







