माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांचा अर्ज बाद
| मुरुड | विशेष प्रतिनिधी |
मुरुड नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा राजकीय धक्का बसला असून, दोन वेळा नगराध्यक्षपद भूषवलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या स्नेहा किशोर पाटील यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद ठरला आहे. यामुळे मुरुडच्या राजकारणात खळबळ माजली असून, भंडारी समाजात तीव्र नाराजी उसळली आहे.
स्नेहा पाटील यांनी मागील निवडणुकीत प्रथमच मुरुड नगराध्यक्षपद शिवसेनेच्या हाती आणताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. स्वच्छ प्रतिमा आणि कणखर नेतृत्वामुळे त्यांना शहरात मोठा जनाधार असून, आ. महेंद्र दळवी यांच्याच आग्रहावरून त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्ज दाखलवेळी भंडारी समाजासह मोठा समर्थक वर्ग उपस्थित होता.
शिंदे गटाचा उमेदवार बाद
याचवेळी आमदार दळवी यांनी कल्पना पाटील यांनाही उमेदवारी दिल्याची माहिती बाहेर आली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच छाननीवेळी स्नेहा पाटील यांचा अर्ज एबी फॉर्म संदर्भातील तांत्रिक कारणावरून बाद ठरवल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
'स्ट्रॅटेजी' की 'राजकीय काटा'?
मुरुडमध्ये सर्वाधिक अनुभव असलेली आणि नगरपालिकेचा कारभार दोन वेळा सांभाळलेली एकमेव नेत्या असतानाही स्नेहा पाटील यांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याने हा निर्णय मकाटछाटीचा डावफ म्हणून पाहिला जात आहे.
भंडारी समाजात संताप
मुरुडच्या राजकारणात भंडारी समाज निर्णायक मानला जातो. या समाजचा स्नेहा पाटील यांना ठाम पाठिंबा होता. त्यांचा अर्ज बाद झाल्याने भंडारी समाजात तीव्र नाराजी पसरली असून, हा राग थेट मतदानात व्यक्त होण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेला केवळ नगरपरिषदच नव्हे, तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परिणामी, मुरुडमधील आगामी राजकीय समीकरणे काय वळण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






