राजकीय पक्ष वाढले, चिन्हात आली वैविधता

उमेदवारांना 196 चिन्हांचा पर्याय; इच्छुकांत आकर्षक निवडणूक चिन्हाची क्रेझ

। रायगड । सुयोग आंग्रे ।

प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी नसल्यास अपक्ष म्हणून लढताना उमेदवारांना मतदारांवर प्रभाव पडेल किंवा त्यांच्या लक्षात राहील असेच निवडणूक चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत पारंपरिक चिन्ह जास्त असल्याने त्यात निवडीला वाव नसायचा, त्यात अपक्षांची संख्या जास्त झाली, तर महत्त्वाचे चिन्ह मिळवायची मोठीच स्पर्धा असायची. काही चिन्ह तर शिट्टी, कुकर, पतंग अशी काही चिन्ह खेळणी वाटत असल्याने उमेदवारांचा कल नसायचा. मात्र आता घसघशीत 196 चिन्हांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, नुसतीच चिन्हच वाढलेली नाही तर त्यात नावीन्यता आली आहे.

राष्ट्रीय पक्ष वाढले राष्ट्रीय व राज्य पक्षांची मान्यता वाढलेल्या पक्षांमुळे यावेळी पक्षांच्या चिन्हात वाढ झाली आहे. पारंपरिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पंजा), भारतीय जनता पक्ष (कमळ), राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कनीस-विळा), शिवसेना (धनुष्यबाण), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (इंजिन), बहुजन समाज पार्टी (हत्ती) या पारंपरिक चिन्हांत आता तृणमूल काँग्रेस (फुल- गवत), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (हातोडा-विळा-तारा), नॅशनल पीपल्स पार्टी (पुस्तक) या पक्षांच्या चिन्हाची भर पडली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा निवडणूक चिन्हांत समावेश झाला आहे. त्यात सीसीटीव्ही, पेनड्राइव्ह, बेबी वॉकर, पेन स्टॅन्ड, रूम कुलर, स्विच बोर्ड, भेटवस्तू, टूथ पेस्ट, इंजेक्शनची सिरीन, दुर्बीण, कॅमेरा, बॅटरी, सायकलचा पंप, क्रेन अशा नानाविध वस्तूंसोबत कालबाह्य झालेलं दळण दळायचं जातं, बांगड्या, चपला, हार, हिरा, कढई, फोन चार्जर, प्रेशर कुकर, कॅमेरा, बुद्धिबळ, हेल्मेट, पत्रपेटी ट्रक, ट्रॅक्टर, मोत्यांचा हार, बॅटरी, बूट, मोजे अशी चिन्हेदेखील आयोगाने उपलब्ध करून दिली आहेत. चाळणीपर्यंत घरगुती वस्तूंना निवडणूक चिन्हांत स्थान मिळाले आहे. निवडणूक चिन्हांत खाद्य पदार्थांच्या वस्तूंची रेलचेल आहे. जेवणाच्या ताटापासून ब्रेड टोस्टर, सफरचंद, बिस्कीट, केक, फळांची टोपली, पाव, बिस्कीट, केक, ब्रेड टोस्ट अशा बेकरी पदार्थांसह आइस्क्रिम, द्राक्ष, भुईमुगाच्या शेंगा यांसह भाज्यांचा समावेश आहे. फणस, भेंडी, कलींगड, अक्रोड आदी फळांना स्थान आहे. घरगुती वस्तूंशिवाय सार्वजनिक वस्तूंची रेलचेल आहे. त्यात कपाट, एअर कंडिशनर, फुगा, बांगड्या, फलंदाज, दुर्बीण, विटा, कोट, झगा, फुटबॉल, विजेचा खांब, ऊस शेतकरी, गॅस सिलिंडर, हॅट, किटली, चावी, काडेपेटी, लायटर, नेलकटर, गळ्यातील टाय, तंबू, करवत, जेवणाचे ताट, मटार, पेनड्राइव्ह, अननस आदी विविध प्रकारची 197 मुक्त चिन्हे अपक्षांना उपलब्ध आहेत.

Exit mobile version