देशात धर्माच्या नावाखाली राजकारण

नागरिकांनी डाव्या पक्षाच्या मागे उभे राहावे – कॉ. उदय नारकर

| बीड | प्रतिनिधी |

देशात धर्माच्या नावाखाली राजकारण सुरू असून, भांडवलशाहीला खतपाणी घालण्याचे काम भाजपाकडून होत आहे, अशी टीका कॉ. उदय नारकर यांनी केली. जिल्ह्यातील माकप, भाकप, शेकाप या डाव्या पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा 12 जानेवारी रोजी नीलकमल हॉटेल येथे संपन्न झाला. जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, देशात सर्वसामान्य माणसाच्या पोटाच्या प्रश्नाशिवाय धार्मिक तेढ निर्माण करून आपण कशा पद्धतीचे धर्म उद्धारकर्ते आहोत, हे दाखवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे, सर्वसामान्य माणूस महागाईने होरपाळत चालला आहे, धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजप आटापिटा करत आहे. मात्र, सर्वसामान्य माणूस हा पोटाच्या खळगी भरण्यासाठी झगडत आहे, काय विकास केला ते पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेऊन कधीच सांगितले नाही.

देशात वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला सरकारला वेळ नाही, पंतप्रधानांचा नाशिक येथे दौरा होता तर गुन्हेगारासारखे डाव्या पक्षाच्या व इतर समाजाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या प्रतिनिधींना पोलिसांनी अटक केली. या घटनेचा निषेध करुन अनेक मुद्द्यांना हात घालत सरकारवर टीका केली. आम्ही विचारांसाठी कधी काँग्रेस-राष्ट्रवादीची, इतर मित्रपक्षांची साथ सोडली नाही, भाजपला अंगावर घेऊन डावे कार्यकर्ते काम करतात यापुढे ही करत राहतील, मत सीपीआयचे नेते कॉ. सुभाष लांडे यांनी व्यक्त केले.

कॉ. अजय बुरांडे यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर डाव्या पक्षाचा 13 फेब्रुवारीला मोर्चा काढण्याचा ठराव मांडला. सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्याला होकार दिला. प्रस्ताविक करताना कॉ. नामदेव चव्हाण यांनी जिल्ह्यातील परिस्थितीवर कशा पद्धतीने काम करावे लागेल, भविष्यात मोठं काम उभं करता येईल, यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. भाऊराव प्रभाळे यांनी केले, तर आभार कॉ. मोहन जाधव यांनी मानले. यावेळी कॉम्रेड पी.एस. घाडगे, प्रभाळे, भाई लोंढे, भाई विष्णुपंत घोलप, भाई बाळासाहेब घुमरे, महादेवराव नागरगोजे, जोतिराम हुरकुडे, नारायण भाई गोले पाटील उपस्थित होते.

बीडमधील राजकीय सामाजिक परिस्थिती बघता जिल्ह्यामध्ये आम्ही भले संख्येने कमी असो, मात्र सर्वाधिक लोकचळवळीचे काम आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व अग्रेसर असतो. आजही डाव्या पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. यामुळे इंडिया आघाडीमधून डाव्या पक्षाला लोकसभेची जागा मागावी, असा ठराव भाई मोहन गुंड यांनी मांडून वरिष्ठांकडे मागणी केली.
Exit mobile version