राजकारणाचा पोरखेळ झालाय असं अनेकांना वाटतं. बरोबरच आहे. आमच्याकडच्या मशालीनं गद्दारी जाळून टाकू किंवा आमच्याकडची ढाल-तलवार म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आहे अशी पोरासोरांसारखी भांडणं करणं याला दुसरं काय म्हणणार? सध्या महाराष्ट्रात हेच तर घडतंय. पण भांडणारी पोरं नंतर क्षणात एक होतात. गळ्यात गळे घालतात. तेही घडतं आहेच. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व भांडणारी आणि एकमेकांचे गळे पकडणारी मुलं एकत्र आलेली दिसली. अध्यक्षपदाच्या लढतीत संदीप पाटील यांना हरवण्यासाठी अमोल काळे यांना उभं करण्यात आलं. काळे हे नागपूरचे असून विद्युत कंत्राटदार, बिल्डर, आयटी कंपनीचे मालक इत्यादी बरेच काही आहेत. एक नक्की की ते क्रिकेटवाले नाहीत. क्रिकेटशी त्यांचा काहीही संबंध नाही.देवेंद्र फडणवीसांचे मित्र असल्याचा त्यांना फायदा झाला. जसा त्यांचे वडिल किशोर काळ यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी चांगले संबंध असल्याचा झाला होता. फडणवीस मुख्यमंत्री कंत्राटदार आणि सरकारी कामांचे इच्छुक हे काळे यांच्या घरीच गर्दी करीत असत. काळे हे देवेंद्रांसाठी काय काय कामे करतात याचा यावरून अंदाज यावा. नागपूरच्या रस्त्यांवर एलईडी बसवण्याचं कंत्राट त्यांना मिळालं होतं. त्यावरून बरेच आरोप झाले होते. अशा पार्श्वभूमीच्या माणसाला पाठिंबा द्यायला शरद पवार, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे एकत्र आले. आशिष शेलार यांना बीसीसीआयचे खजिनदार करण्याला त्यांनी पाठिंबा दिला. त्यासाठी एक सर्वपक्षीय जंगी मेजवानी झाली. तिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही हजर होते. पवार-शेलार गट हा मुंबई क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाईल असा आशीर्वाद त्यांनी दिला. शेलार हे एरवी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कोणत्याही पातळीवर जाऊन टीका करीत असतात. त्यावेळी असं वाटतं की पवार हे शेलार यांचं तोडंही कधी पाहणार नाहीत. खालच्या स्तरावर या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते या टीकेमुळे एकमेकांशी शत्रुत्व घेतात. घराघरात भांडणं होतात. नाती तुटतात. डोकी फुटत नाहीत इतकंच. पण तिकडे मुंबईत मात्र शेलार आणि पवार हे कितीतरी वर्षांचे मित्र असल्यासारखे वागू लागतात. किंबहुना ते कधी खरंच शत्रू होते का असा प्रश्न पडतो. खेळात राजकारण आणू नका असं हे नेते वारंवार सांगतात. पण ‘मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक’ यातला क्रिकेट हा एकमेव शब्द फक्त खेळाशी संबंधित आहे. बाकी सगळं राजकारणच आहे. कोणतीही निवडणूक ही राजकीय असते. ही तर जगातील एका अतिश्रीमंत खेळाशी संबंधित अतिश्रीमंत संघटनेची निवडणूक होती. त्यात शेकडो कोटींची कंत्राटे, प्रसिद्धीचा झगमगाट, मोठ्या वर्तुळात सत्ता गाजवण्याची संधी सर्व काही आहे. क्रिकेट संघटनेमध्ये राजकारण्यांना पदं देऊ नका असं लोढा समितीनं सांगितलं होतं. ते काही वर्ष पाळलं गेलं. पण ते या ना त्या मार्गाने धाब्यावर बसवण्यात आलं. बीसीसीआयच्या सरचिटणीसदी अमित शाह यांचे चिरंजीव जय आहेत. सध्या भारतीय क्रिकेटची सर्व सूत्रे त्यांच्याच हाती आहेत. अलिकडे सौरव गांगुली यांना पुन्हा अध्यक्ष न करण्याचा जो निर्णय झाला त्याची बैठक अमित शाह यांच्या घरीच झाली होती. पवार यांनी सत्तेची ही पावले ओळखली आहेत. पवारांच्या राजकीय अनुभवाइतकं ज्यांचं वय असेल अशा आशिष शेलारांच्या मागे महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची ताकद निमूटपणे उभी राहते ही घटनाच पुरेशी बोलकी आहे. तिकडे जय शहा यांच्या जोडीने काँग्रेसचे राजीव शुक्ला हेही ठळकपणे वावरतात हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे. ज्या पवारांना बारामतीतून उखडून टाकण्याचा भाजपने जाहीर इशारा दिला आहे आणि त्यांच्या नबाब मलिक, अनिल देशमुख इत्यादींविरुध्द ईडी लावली आहे ते खरे की देवेंद्रांचे पवारांसोबतच्या गुफ्तगूचे राजकारण खरे असा प्रश्न कार्यकर्त्यांनी या दोन्ही नेत्यांना विचारायला हवा. कवी गजानन माधव मुक्तिबोध यांनी पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है असा प्रश्न एका कवितेतून विचारला होता. लोकांना मूर्ख समजणार्या राजकारण्यांना आता हाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
खेळाचं राजकारण

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026