महाडमधील टेमघर नाला प्रदुषित

प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष
। महाड । प्रतिनिधी ।
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदुषण सुरु असुन या परिसरातील असलेला टेमघर नाला पुन्हा प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या नाल्याच्या जवळ असलेल्या रासायनिक कारखान्यांमुळे नाल्यातील पाणी दुषित झाले असून हे पाणी थेट सावित्री नदीच्या पात्रांमध्ये सोडले जात असल्याने नदीचे पाणी देखील दुषित झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झालेला असताना प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या रासायनिक कारखान्यातील सांडपाणी परिसरामध्ये सोडण्यात येत असल्याने अनेकदा तक्रारी करुनही प्रदुषण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून टेमघर गावाजवळ असलेल्या नाल्यामध्ये पांढर्‍या रंगाचा फेस असलेले पाणी वाहत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनाला आले. या नाल्याजवळ असलेल्या कारखान्यातून प्रदुषित पाणी सोडण्यात आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा नाला सावित्री आणि काळ नदीचा संगमामध्ये जोडण्यात आला आहे. याच संगमाच्या ठिकाणी या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांशी कंपन्या रसायन उत्पादन करणार्‍या असल्याने या कारखान्यातील सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये सोडले जाते. या केंद्रामध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते आणि त्यानंतर आंबेतच्या खाडीत ओवळे गावाजवळ असलेल्या सावित्री खाडीमध्ये सोडले जाते. परंतु सांडपाण्याची प्रक्रिया करण्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च येत असल्यामुळे अनेक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नाल्यांमध्ये सोडत असल्याचे अनेकदा आढळून आलेले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून केवळ नोटीसा बजावल्या जातात आणि यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदुषणाचा प्रश्‍न सुटलेला नाही.

Exit mobile version